गोव्यातील वास्को येथील सदा उपकारागृहातून सुमारे ४५ कैद्यांनी मंगळवारी रात्री तुरूंगातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा येथील कारागृहात पाठवण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास किरकोळ कारणावरून कैद्यांच्या या समूहाने तुरूंग अधिक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात तुरूंग अधिक्षक गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक लॉरेन्स डिसूझा यांनी दिली. सर्व ४५ कैद्यांनी एकत्रित येऊन तुरूंगातील अधिकारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.