बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाकडून टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा रक्षकाने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना व्हीआयपी एन्ट्री न दिल्याने शिंदेंच्या सुरक्षा रक्षकाने गोंधळ घालत या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समजते. संदीप घोंगडे असे मारहाण करण्यात आलेल्या टोल कर्मचाऱ्याचे नाव आहे. संदीप घोंगडेवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांनी सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे.
एकनाथ शिंदे हे एका लग्नसोहळ्यासाठी नाशिकला गेले होते. तेथून पुन्हा ठाण्याकडे परतताना मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. घोंगडेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. दरम्यान, जखमी कर्मचाऱ्याने शिंदेंची माफी मागितल्यानंतर परिसरातील तणाव कमी झाल्याचे सांगण्यात येते. अद्यापपर्यंत या घटनेसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या सुरक्षारक्षकाने मारहाण केला नसल्याचा दावा केला आहे. त्याने फक्त काचेवर हात ठेवला होता. योगायोगाने ती काच फुटली, असे त्यांनी म्हटले आहे. टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *