रॅपर बादशाह रुग्णालयात दाखल

डीजे वाले बाबू मेरा गाना बजादे’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला रॅपर बादशाह त्याच्या अनोख्या आणि देसी रॅपच्या शैलीमुळे प्रेक्षकांच्ये मनावर राज्य करत आहे. पंजाबी, हिंदी शब्दांचा सुरेख मेळ साधत त्याला काहीसा पॉप बाज देत बादशाह त्याची अशी काही मांडणी करतो की अनेकजण त्याच्या या अंदाजावर फिदा होतात. त्यातही गेल्या काही वर्षांपासून रॅप, रॉक, पॉप या संगीतप्रकारांमध्ये वाढ झाल्यामुळे बादशाह चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध लाइव्ह कॉन्सर्ट्स, रिअॅलिटी शोमध्ये व्यग्र असणाऱ्या या कलाकाराना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार श्वसनाच्या त्रासामुळे बादशाहला दिल्ली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळत आहे.

बादशाह बऱ्याच दिवसांपासून त्याच्या कामामध्ये फारच व्यग्र होता. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान पुणे, सुरत, मुंबई आणि नोएडा या ठिकाणी बादशाहच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि कामाच्या या अतिव्यापामुळेच बादशाहला हा त्रास झाला असल्याचे म्हटले जात आहे. तुर्तास बादशाहला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

बादशाहच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बादशाह कामात कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता त्याने दिलेल्या शब्दासाठी सतत काम करत होता. विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होता. १८ जानेवारीला पुण्यात एका महाविद्यालयीन कार्यक्रमासाठी तो आला होता त्यांतर तो लगेचच सुरतला गेला. २० आणि २१ जानेवारीदरम्यान मुंबईत काही कार्यक्रमांच्या चित्रिकरणानंतर बादशाह श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असेही बादशाहच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, बदाशाहच्या प्रवक्त्यांनीही तो रुग्णालयात दाखल झाल्याची अधिकृत माहिती दिली होती.

बादशाहची वाढती लोकप्रियता पाहता त्याच्या चाहत्यांमध्ये ही बातमी ऐकताच चिंतेचे वातावरण होते. पण, सध्या काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रॅपर बादशाह सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच नावाजला जात आहे. काही दिवसांपूर्वीच रॅपर बादशाहाच्या आयुष्यात त्याच्या चिमुकल्या मुलीचे आगमन झाले होते. त्यावेळीसुद्धा बादशहा फार आनंदात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *