केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेतल्या जाणा-या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी मंडळाकडून जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार देशात या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची सुरुवात ९ मार्चपासून होणार आहे.
या परीक्षा २९ एप्रिलपर्यंत चालतील. देशात उत्तर प्रदेश, पंजाब आदी पाच राज्यांत होणा-या विधानसभांच्या निवडणुकांमुळे या परीक्षा मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच दोन आठवडय़ांहून अधिक उशिराने सुरू होत आहेत.
यंदा या परीक्षेला देशभरात दहावीचे १६ लाख ६७ हजार ५७३ विद्यार्थी, तर बारावीचे १० लाख ९८ हजार ४२० विद्यार्थी बसणार आहेत. तर या परीक्षा उशिराने सुरू होत असल्या तरी निकाल मात्र दरवर्षीप्रमाणेच लागतील. त्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी माहिती सीबीएसईचे अध्यक्ष आर. के. चतुर्वेदी यांनी दिली.