पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ महिन्याच्या चिमुरडीला जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. अरूधंती रमेश ढाकणे (वय ९ महिने) असे या बालिकेचे नाव आहे. अरूंधतीच्या मृत्युस डॉक्टर हेच जबाबदार असल्याचा आरोप वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्याला मुली गमवावी लागल्याचे ते म्हणाले.
अरूंधतीची प्रकृती नाजूक असतानाही डॉक्टरांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करुन घेतले नाही. तसेच बाहेरुन औषधे आणून घरी पाठवून दिले. घरी गेल्यावर तिची प्रकृती खालावली आणि त्यात मुलगी दगावल्याचा आरोप मृत अरूंधतीचे वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे. अरूंधतीला वेळीच उपचार मिळाले असते तर ती बचावली असती, असे त्यांनी म्हटले.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.