जोशींच्या फ्लॅटचे वीज व पाणी तोडले?

जोशींच्या फ्लॅटचे वीज व पाणी तोडले?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फारसे मधुर संबंध नसणारे भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री संजय जोशी हे नवी दिल्लीत ज्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत, त्या फ्लॅटचे वीज व पाणी तोडण्यात आल्याचे कळते.

केंद्रात सत्तांतर झाल्यापासून संजय जोशी नॉर्थ अॅव्हेन्यूवर मध्य प्रदेशातील टिकमगढचे भाजपचे खासदार डॉ. वीरेंद्रकुमार यांच्या फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते. लोकसभेवर सहावेळा निवडून आलेले वीरेंद्रकुमार यांना नॉर्थ अॅव्हेन्यूवर ४५-४६ असे दोन फ्लॅट मिळाले होते. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये संजय जोशी वास्तव्याला होते. पण वीरेंद्रकुमार यांना २२, महादेव रोड हा बंगला देण्यात आला आणि नॉर्थ अॅव्हेन्यूवरील फ्लॅट सोडण्याविषयी त्यांच्यावर पक्षातून दबाव आणला गेल्याचे कळते.

ज्येष्ठ संसद सदस्य या नात्याने वीरेंद्रकुमार यांना नियमांनुसार पाहुण्यांसाठी अतिरिक्त फ्लॅट मिळू शकतो. पण वीरेंद्रकुमार यांनी दोन्ही फ्लॅटचा ताबा सोडल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी संजय जोशी राहात असलेल्या फ्लॅटचे वीज आणि पाणी तोडल्याचे समजते. त्यानंतर जोशी संबंधित फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

केंद्रात यूपीएची सत्ता असताना भाजप खासदाराच्या फ्लॅटमध्ये राहणारे जोशी यांच्या वास्तव्याला कोणी आक्षेप घेतला नाही. पण वर्षभरापूर्वी दिल्लीत मोदींचे सरकार येताच जोशींच्या मागे पक्षातून ससेमिरा लागला आहे. दीड महिन्यांपूर्वी, ६ एप्रिल रोजी संजय जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणारे पोस्टर्स लावल्याबद्दल अनेक खासदारांसह जोशी यांच्या समर्थकांना भाजपमधून दम देण्यात आला होता. जोशींना शुभेच्छा देणाऱ्या पोस्टर्सवर स्वत:चे छायाचित्र छापल्याचा ‘गुन्हा’ घडल्यामुळे ‘आयुष’चे मंत्री श्रीपाद नाईक यांचे स्वीय सहायक नितीन सरदारे यांना या स्वीय सहायकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *