नोटाबंदीच्या निर्णयानंतर ग्राहकांप्रमाणे बँका आणि कर्मचारीही भरडून निघत असून या त्रासामुळे कर्मचारी वैतागले आहेत. या त्रासाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटना येत्या २८ डिसेंबरला ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत.
त्यानंतर बँक संघटनांतर्फे २९ डिसेंबरला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देण्यात येणार आहे. दोन्ही संघटनांचे देशभरातील नऊ लाख बँकांमधील साडेपाच लाख सदस्य आहेत. या कर्मचारी संघटनांचे सदस्य २ आणि ३ जानेवारी रोजीही ठिकठिकाणी निदर्शने करतील.
रिझर्व्ह बँकेच्या स्थानिक अधिका-यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल. सर्व बँका आणि शाखांना देण्यात येणा-या रोकडचे प्रमाण निश्चित केले जावे, तसेच सर्व एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे टाकण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. बँकांना देण्यात येणा-या रोकडबाबत पारदर्शक धोरण बनवण्यात यावे, अशी संघटनांची मागणी आहे.
नोटाबंदीनंतर ज्या व्यक्तींचा आणि सेवेत असताना कामाच्या ताणामुळे ज्या बँक कर्मचा-यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. नोटाबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक बँकांतील कर्मचारी आणि अधिका-यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे बँक कर्मचारी आणि अधिका-यांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने आणि आरबीआयने द्यावी, बँकेत उशिरापर्यत थांबून काम करणा-या कर्मचा-यांना आणि अधिका-यांना त्याचा मोबदला देण्यात यावा, अशाही मागण्या संघटनांनी केल्या आहेत.