आता हनिमूनसाठी चंद्रावर जाण्यासाठी व्हा तयार

‘चलो दिलदार चलो.. चाँद के पार चलो…’ असं आपल्या प्रियकराला सांगणारी हिरॉईन असो नाहीतर आपल्या प्रेयसीलाचंद्र तोडून आणून देण्याचं वचन देणारा हिरो असो. चंद्र हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.चंद्रावर वस्ती करण्याचं स्वप्न हे नील आर्मस्ट्राँगच्या पहिल्या पावलापासून पाहिलं गेलं. मात्र हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणं शक्य आहे. इतकंच काय, लग्नानंतर हनिमूनला चंद्रावर जायचं असेल, तर त्याचं तिकिट देणारी कंपनीही तयार झाली आहे.

युरोपियन अंतराळ संस्थेनं जगाला एक नवं स्वप्न दाखवलं आहे. चंद्रावर राहण्याचं. येत्या 10 वर्षांत माणसाची चंद्रावर वस्ती असू शकते, असं भाकित ESAनं केलं आहे आणि हे चांद्रग्राम कसं असेल, याचा एक प्रतिकात्मक व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या विवरांमध्ये बर्फाच्या स्वरुपात पाणी असल्याचा वैज्ञानिकांना विश्वास आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाचं डॉन हे यान सेरेस नावाच्या एका अशनीवर सोडण्यात आलं होतं. या अशनीवरदेखील विवरं होती आणि त्यांच्यामध्ये पाण्याचा अंश आढळला होता. चंद्रावरदेखील अशीच परिस्थिती असेल, असा ठाम विश्वास संशोधकांना आहे. त्यामुळे भावी काळातल्या वस्तीला तिथूनच पाण्याचा पुरवठा होऊ शकेल, असं मानलं जातंय. चंद्राचं विषम तापमान हादेखील एक चिंतेचा विषय आहे. रात्रीच्या वेळी तिथं उणे 200 अंशांपर्यंत पारा खाली घसरतो. मात्र चंद्रावर उपलब्ध असलेली खनिजं आणि अन्य सामुग्रीचा वापर करून तिथं वास्तव्य करणं शक्य आहे, असं ठाम मत वैज्ञानिकांनी मांडलं आहे.

दुसरीकडे भारतीय वंशाचे नवीन जैन यांनी एलन मस्क यांच्या सोबतीनं ‘मून एक्सप्रेस’ नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. 10 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 7 लाख रूपये शुल्क आकारून नवविवाहित दाम्प्त्याला चंद्रावर हनीमूनसाठी पाठवण्याची योजनाच त्यांच्या कंपनीनं आखली आहे.

अर्थात चंद्रावरची वस्ती हे मानवाच्या अंतराळ प्रवासातलं फक्त पहिलंच स्थानकच आहे. त्यापुढे मंगळही संशोधकांना खुणावतो आहे. त्यामुळे चंद्रावर जितक्या लवकर वस्ती होईल, तितक्या लवकर पुढची वाट सुलभ होणार आहे. त्यामुळे ESA, नासा आणि जगभरातल्या अंतराळ संशोधन संस्था किती जलद हालचाल करतात आणि त्यांची सरकारं त्यांना किती निधी उपलब्ध करून देतात, यावरच या अंतराळप्रवासाचं भवितव्य अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *