थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पोलिसांचे कडक निर्बंध

जर्मनी तसंच फ्रान्समधील दहशतवादी ट्रक हल्ल्यानंतर मुंबईतही घातपाताची शक्यता वर्तवण्यात येतेय… या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर कडक निर्बंध लादण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिलीत.

जर्मनीतील ख्रिसमस मार्केटमध्ये नुकताच झालेला दहशतवादी ट्रक हल्ला… आणि काही महिन्यांपूर्वी फ्रान्समध्ये झालेला दहशतवादी हल्ला यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. गर्दीचा फायदा घेऊन हे दोन्ही दहशतवादी हल्ले घडवण्यात आले. असाच हल्ला मुंबईतही होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच थर्टी फर्स्टच्या पार्टी आयोजकांना मुंबई पोलीस पुढील आदेश देवू शकतात.

काय येऊ शकतील बंधने

– मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी जास्त वेळ कोणालाही थांबता येणार नाही
– गर्दीच्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येईल
– हॉटेलबाहेर पार्किंगच्या ठिकाणी जास्त लाईट्स लावाव्यात
– अनोळखी गाड्यांना हॉटेल मालकांनी तसंच पार्टी आयोजकांनी परवानगी देऊ नये
– पार्ट्यांच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, अशा सूचनांचा त्यात समावेश असणाराय.

मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते. गर्दीचा फायदा घेऊन दहशतवादी कधीही घातपात घडवू शकतात. त्यामुळं मुंबईत नेहमीच सतर्कता बाळगली जाते, असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय.

ख्रिसमसपासूनच मुंबईत रात्रीच्या इअर एन्डींग पार्ट्यांचा मोसम सुरू होणाराय. त्यासाठी मुंबई पोलिसांची जबाबदारी वाढलीय. पण जागरूक मुंबईकर या नात्यानं नागरिकांनीही संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याची गरज आहे. नागरिकांनी असं सहकार्य केलं तर घातपाती हल्ला होण्यापासून मुंबईला सुरक्षित ठेवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *