रिझर्व्ह बँकेने काल जुन्या नोटांच्या भरण्यासंदर्भात नवीन निर्बंध जाहीर केल्यावर मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेला टीकेचे लक्ष्य केले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सातत्याने लागू करण्यात येणारे नवनवे नियम म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे बदलतात तसे रिझर्व्ह बँक नियम बदलत आहे, असा उपरोधिक टोला राहुल यांनी हाणला आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा निर्णय देशातील ९९ टक्के गरीब जनतेविरोधात असल्याचे म्हटले होते. सरकारने भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असता तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो असतो. मात्र, मोदींनी घेतलेला निर्णय भ्रष्टाचाराविरोधात नसून गरीब व शेतक-यांविरोधातील आहे, असे राहुल यांनी जौनपूर येथील सभेत म्हटले होते.
नोटाबंदीनंतर उलटसुलट नियम जाहीर करण्याची मालिका खंडित होऊ न देता सरकारने सोमवारी आणखी एक म्हणजेच ५६वा निर्णय जाहीर केला. त्यानुसार बंदी आणलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या स्वरूपातील ५००० रुपयांहून अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यत एकदाच बँकेत भरता येणार आहेत, तसे करतानाही ही रक्कम यापूर्वी का भरता येऊ शकली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. यासोबत भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात बुधवारी कपात करण्यात आली. या दोन निर्णयांमुळे सर्वसामान्य संतप्त झाले आहेत.