गोंदियाच्या ‘बिंदल थाट’ या हॉटेलला भीषण आग लागली असून या आगीत सातजणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर सातजणांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. ही घटना बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
‘बिंदल थाट’ हे निवासी हॉटेल गोंदियातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरात आहे. बुधवारी पहाटे या हॉटेलला अचानक आग लागली. काही वेळातच या आगीने भीषण स्वरूप धारण केले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल सात तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली.
या हॉटेलमध्ये अनेक व्यक्ती अडकल्या आहेत. त्यापैकी सातजणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आग लागल्याचे समजताच एका व्यक्तीने जीव वाचवण्यासाठी दुस-या मजल्यावरून खाली उडी मारली. तो यामध्ये गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृ्त्यू झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांना हॉटेलच्या आतमध्ये आणखी पाचजणांचे मृतदेह मिळाले. या सर्वांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही. मात्र सिलेंडरचा स्फोट किंवा शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.