मेक्सिकोतील फटाक्यांच्या बाजारात झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या आगीमुळे ७० जण जखमी झाले आहेत. सॅन पॅब्लिटो नावाने प्रसिद्ध असणाऱ्या फटाक्यांच्या बाजाराला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सॅन पॅब्लिटो हा फटाक्यांचा बाजार मेक्सिकोच्या राजधानीच्या उत्तरेकडील भागात आहे. या आगीमुळे आकाशात धुराचे लोट पाहायला मिळाले.
‘या भीषण आगीत आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर आहे,’ अशी माहिती गव्हर्नर अरुविएल ऍव्हिला यांनी दिली आहे.
‘फटाके बाजाराला लागलेल्या भीषण आगीत १३ चिमुरडे ९० टक्क्यांपेक्षा अधिक भाजले आहेत. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेतील टेक्सासमध्ये पाठवण्यात आले आहे. या आगीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि या आगीचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल,’ असेही ऍव्हिला यांनी सांगितले आहे.
सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे आपत्कालीन सेवेचे प्रमुख इसिड्रो सांचेझ यांनी सांगितले आहे. तर या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
