धनादेशातील रकमेत फेरफार करून एका दाम्पत्याने दुचाकी वितरकाच्या बँक खात्यातून दोन हजार रुपयांऐवजी तब्बल २० लाख रुपयांची रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून संबंधित दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी पोलीस गुजरातकडे रवाना झाले आहेत.
दिंडोरीरोडवरील शांतीचंद्र गुलाबचंद पांडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सप्टेंबर २०१६ मध्ये गंजमाळ येथील जितेंद्र आॅटोमोबाइल्सच्या शोरुममध्ये एक दाम्पत्य दुचाकी खरेदीसाठी आले होते.आपली पत्नी थत्तेनगरमधील एका बँकेची शाखा अधिकारी असून, तिला दुचाकी घेऊन द्यायची असल्याचे सांगून यातील व्यक्तीने दोन हजार रुपये अनामत रक्कम शोरुममध्ये जमा केली.त्यानंतर दोन दिवसांनी परत येऊन आपल्या दुचाकीचे बुकिंग रद्द करीत असल्याचे सांगत जमा केलेल्या पैशांची त्यांनी मागणी केली. त्यानुसार त्यांना रोख रकमेऐवजी दोन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला़
दरम्यान काही दिवसांनी शोरूम चालकांनी आपले पासबुक तपासले असता त्यात दोन हजारांऐवजी २० लाख रुपयांचा धनादेश वटविल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी या दाम्पत्याविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर धनादेश गुजरातमधील राजकोट येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतून वटवून घेतला गेल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
धनादेश नाशिकरोडमधीलपूजा अनंत वाळवे या नावाने देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या नावाची महिला अस्तित्वात नसल्याचेही आढळून आले आहे. पोलीस पथक अधिक तपासासाठी गुजरातकडे रवाना झाले असून फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचा शोध घेतला जात आहे.
