शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने भगवद्गीतेतील सातशे श्लोकांचा इंग्रजीत अनुवाद केला असून त्यांचं प्रकाशन करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. इंद्राणी मुखर्जीने स्वत: कनिष्ठ न्यायालयात ही माहिती दिली. शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी सध्या तुरुंगात आहे. न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सोमवारी यासंबंधी अर्ज दाखल करण्यास सांगितलं होतं.
इंद्राणीने न्यायालयात सांगितले की, ‘मी भगवदगीताच्या 700 श्लोकांचं संस्कृतमधून इंग्रजीत भाषांतर केलं आहे. मला हे श्लोक प्रसिद्ध करायचे आहेत’.तसंच पुस्तकाच्या विक्रीतून आलेलं अर्ध उत्पन्न इस्कॉनला दान करण्याचा तर उर्वरित रक्कम भायखळा जेलमधील परित्यक्तांना देणार असल्याचंही तिने यावेळी सांगितलं.
न्यायालयातील युक्तिवाद संपल्यानंतर सीबीआय तपास अधिका-याकडून इंद्राणी मुखर्जीला तिचे वडील उपेंद्र कुमार यांचा काही दिवसांपूर्वी निधन झाल्याचं सांगण्यात आले. ज्यानंतर न्यायालयाबाहेर इंद्राणीला रडताना पाहण्यात आले. इंद्राणीच्या वकिलाने न्यायालयात सीबीआयकडून इंद्राणी मुखर्जीला असंवेदनशील वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. इंद्राणीच्या वडिलांचं निधन गेल्या आठवड्यात गुरुवारी झालं असताना, तिला आता सांगण्यात आल्याचं वकिल बोलले आहेत.
दुसरीकडे पीटर मुखर्जी सध्या आत्मचरित्र लिहित आहेत. त्याचं लेखन पूर्ण करण्यासाठी इंटरनेटविना लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपण दररोज चार तास लेखन करुन लॅपटॉप पुन्हा तुरुंग प्रशासनाकडे देऊ, असं आश्वासन पीटर यांनी दिलं.
एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी पोलिसांनी इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय याला अटक केली. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
