इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प विजयी

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील शेवटचा टप्पा असलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. इलेक्टोरल कॉलेजच्या ५३८ पैकी २७० मत ट्रम्प यांना मिळाले असून या विजयासह आता ट्रम्प यांचा व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानात विजय मिळवणे गरजेचे होते. सोमवारी इलेक्टोरेल कॉलेजचे मतदान पार पडले. यात विजय मिळवण्यासाठी ट्रम्प यांना २७० मतांची गरज होती. ट्रम्प यांना २७० मते मिळाली आहेत. आता पुढील वर्षी म्हणजेच २० जानेवारी रोजी ट्रम्प हे ओबामा यांच्याकडून राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. ट्रम्प हे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष असतील.

८ नोव्हेंबररोजी अमेरिकेतील जनतेने इलेक्टर्स निवडले होते. जनतेने निवडून दिलेले इलेक्टर्स राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. अमेरिकेतील वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानात मत फुटल्याचा अंदाज आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या ४ इलेक्टर्सनही हिलरी क्लिंटनऐवजी दुस-याला मत दिले. तर रिपब्लिकन पक्षाच्या २ इलेक्टर्सनी ट्रम्प यांच्याऐवजी दुस-यांना मतदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकप्रिय मतात हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर २० लाख मतांची आघाडी घेतल्याचे दिसून आले होते. कॅलिफोर्नियासह काही राज्यातील मतांचा मेळ घातला असता क्लिंटन यांची लोकप्रिय मतातील आघाडी पंचवीस लाख मतांच्या पुढे जाऊ शकली असती. क्लिंटन यांना इलेक्टोरल कॉलेजची २३२ मते मिळाली होती प्रत्यक्षात त्यांना २७० मतांची गरज होती. त्यामुळे इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानात विजयी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील एकत्र आणण्यासाठी अथक मेहनत करणार आणि सर्व अमेरिकी नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष होण्याचा प्रयत्न करु असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *