बर्लिनमध्ये ख्रिसमस बाजारात ट्रक घुसला, ९ ठार

जर्मनीमध्ये ख्रिसमसच्या तयारीला अपघाताचे गालबोट लागले आहे. बर्लिनमध्ये ख्रिसमसच्या बाजारात घुसलेल्या भरधाव ट्रकने ९ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात किमान ५० जण जखमी झाले असून ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का यादिशेनेही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बर्लिनमधील क्यूफ्यूरस्टेंडम हा मार्ग पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असून दुकान आणि चित्रपटगृहांमुळे या भागात नेहमीच वर्दळ असते. याच भागात प्रसिद्ध कैसर विल्यम मेमोरियल चर्चदेखील आहे. ख्रिसमसनिमित्त या भागात बाजार भरला असल्याने भेटवस्तू घेण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सोमवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार रात्री) या बाजारात भरधाव ट्रक घुसला. या ट्रकखाली सापडून ९ जणांचा मृत्यू झाला. तर किमान ५० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावरच ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले. तर ट्रक चालकासोबतच्या सहचालकाचा मृत्यू झाला होता. ट्रकचालकाच्या बाजूलाच त्याचा मृतदेह आढळला आहे.

‘संध्याकाळी आम्हाला जोरदार आवाज आला. आम्ही घटनास्थळी धाव घेतली असता ट्रक बाजारात घुसल्याचे दिसले. सर्वत्र रक्ताचे डाग आणि ओरडण्याचा आवाज येत होता. ते भयावह दृश्य होते’ अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शीने दिली. तर ट्रक जेव्हा बाजारात घुसला त्यावेळी त्याचा वेग किमान ६० किलोमीटर प्रति तास असावा असे एका पर्यटकाने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि पोलिसांचे पथक दाखल झाले असून संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आहे. हा हल्ला होता की ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला या सर्व बाजूंनी तपास सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान स्थानिकांनी घराबाहेर पडू नये आणि अफवा पसरवू नये असे आवाहन बर्लिन पोलिसांनी केले आहे.

जर्मनीतील या घटनेने फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्याच्या घटना ताज्या झाल्या आहेत. जुलै महिन्यात पॅरिसजवळील नीस या शहरात एका माथेफिरू ट्रकचालकाने शस्त्रास्त्रांनी भरलेला ट्रक थेट गर्दीत घुसवून शेकडो लोकांना चिरडले. या हल्ल्यात ८४ जण ठार झाले होते.  राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीवर हा ट्रकहल्ला झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *