रात्रभर कोसळलेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर सकाळी पावसाची संततधार कायम राहिल्याने ठप्प झालेले मुंबईचे जनजीवन शुक्रवार संध्याकाळपर्यंत पूर्ववत होऊ शकले नाही.
संध्याकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट-अंधेरी, ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी आणि मध्य रेल्वे मार्गावर कर्जत-कल्याण दरम्यान लोकलसेवा सुरु झाली. मात्र ही वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरु होती.
रुळावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने तीन्ही मार्गावरील लोकल सेवा सकाळी बंद होत्या. रस्त्यावर जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीचाही बोजवारा उडाला. मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांनी बेस्टचा पर्याय निवडला मात्र सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे बेस्टची वाहतूकही मंदगतीने सुरु होती.
दुपारी अडीचच्या सुमारास समुद्राला भरती होती. यावेळी ४.४७ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. मुंबईजवळ अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होणार असल्याने पुढच्या २४ तासात मुंबईत पावसाचा जोर असाच राहील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती मात्र स्थानकांवर घोषणेव्दारे व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात अधिकच भर पडली.
रुळावर साचलेले पाणी आणि अर्धा-एक तासानेही लोकल येत नसल्याने अनेक प्रवाशी माघारी फिरत होते. दादर, कुर्ला, हिंदमाता, एलिफस्टन, मिलन सबवे, अंधेरी, मालाड, चकाला, बोरीवली, सांताक्रूझ येथील सखल भाग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला.
एलफिस्टन, हिंदमाता या सखल भागाला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. कामावर पोहोचणे अनिवार्य असलेले नोकरदार कमरेभर पाण्यातून मार्ग काढत होते. महापालिका आयुक्तांनी शनिवारीही शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मागच्या काही वर्षातील जून महिन्यातील पावसाचे सरासरी प्रमाण पाहिले तर, यंदा एकाच दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
दादर, कुर्ला, हिंदमाता, एलिफस्टन, मिलन सबवे, अंधेरी, मालाड, चकाला, बोरीवली, सांताक्रूझ येथील सखल भाग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. एलफिस्टन, हिंदमाता या सखल भागाला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. कामावर पोहोचणे अनिवार्य असलेली नोकरदार कमरेभर पाण्यातून मार्ग काढत होते.

