शैक्षणिकदृष्ट्या इतर भारतीय राज्यांपेक्षा प्रगत असलेल्या केरळमध्ये या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. देशात प्रथमच तृतीयपंथीय मुलांसाठी निवासी शाळेची स्थापना केरळमधील कोची येथे होणार आहे.
सहज आंतरराष्ट्रीय विद्यालय असे या शाळेचा नाव असून तृतीयपंथीय मुलांना येथे राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती या तृतीयपंथीय कार्यकर्त्या विजयराज मल्लिका, माया मेनन आणि फैसल सीके यांनी दिली.
सुरुवातीला या विद्यालयात १० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. हे विद्यार्थी मुक्त शाळा पद्धतीच्या अभ्यासक्रमानुसार १० किंवा १२ वीची परीक्षा देतील अशी माहिती देण्यात आली आहे. ३० डिसेंबरपासून या शाळेला शुभारंभ होणार असल्याची माहिती कल्की सुब्रमण्यम यांनी दिली. ही शाळा ट्रांस इंडिया फाउंडेशनच्या सहा कार्यकर्त्या ही शाळा चालविणार आहेत. या शाळेसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी एक अपंग आहे आणि एक परराज्यातील आहे.
जेव्हा आम्ही ही योजना सुरू करण्याचे ठरवले तेव्हा अगदी मोजक्याच लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याचे ठरवले होते. या शाळेसाठी आम्हाला सरकारच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे विजयराज मल्लिका यांनी म्हटले.
केरळ कॅथोलिक बायबल सोसायटी आणि राष्ट्रीय मुक्त शाळा यांनी या कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या शाळेवर वर्ग घेण्यासाठी अनेक शिक्षक स्वयंस्फूर्तीने पुढे सरसावले आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाधारित शिक्षणदेखील देण्यात येणार आहे.
वाढत्या वयात काही तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून द्यावे लागते. या शाळांमुळे ते प्रमाण घटेल याबद्दल या शाळेच्या संस्थापकांना विश्वास वाटत आहे. तृतीयपंथीयांना मुक्तीचा आणि स्वतंत्रतेचा अनुभव होण्यासाठी शिक्षण हा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे मल्लिका यांनी म्हटले. या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले.