येत्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल दुप्पट करू म्हणणाऱ्या रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाला न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला ११ लाखांचा दंड ठोठावला आहे.
रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनांची घोडदौड संपूर्ण देशभरात सुरू आहे. पतंजली दंतकाती टुथपेस्ट, शॅम्पू, अशी कितीतरी उत्पादने पतंजलीद्वारे निर्माण केली जातात. पतंजलीची जाहिरात दिसत नाही अशी एकही वाहिनी देशभरात नसेल. पतंजली आयुर्वेद लिमिटेडने ग्राहकांची दिशाभूल केली आहे असे हरिद्वार न्यायालयाने म्हटले आहे.
पतंजली आयुर्वेद लिमिटेडने आपल्या जाहिरातींमधून खोटा प्रचार केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्या. ललीत नारायण मिश्रा यांच्या न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला हा दंड ठोठावला आहे. अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ५२ (मिसब्रॅंडिंग) दुसऱ्या उत्पादनांना स्वतःचे लेबल लावणे आणि कलम ५३ (मिसलिडिंग) फसवी जाहिरात दाखवणे या कायद्याअन्वये त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, अन्न सुरक्षा कायदानुसार (पॅकिंग अॅंड लेबलिंग रेग्युलेशन्स) कलम २३.१ च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पतंजली आयुर्वेदने काही उत्पादनांना आपले लेबल लावले होते ज्यांची निर्मिती त्यांच्या कंपनीद्वारे झाली नव्हती. त्या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. भविष्यात अशी चूक करू नका अशी ताकीददेखील न्यायालयाने दिली होती.
२०१२ मध्ये पतंजलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मध, मीठ, मोहरीचे तेल, जॅम आणि बेसनाचे नमुने गोळा करण्यात आले होते. ही उत्पादने निकृष्ठ असल्याचे चाचणीमध्ये आढळून आले.
मागील आर्थिक वर्षात ५,००० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या पतंजली आयुर्वेदने चालू वर्षासाठी १०,००० कोटींची उलाढाल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या निकालामुळे पतंजलीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

