बोटीतले इंधन संपले; पर्यटक समुद्रात अडकले

बोटीतले इंधन संपले; पर्यटक समुद्रात अडकले

फेसाळता समुद्र… अनेक मीटर उंच उसळणाऱ्या लाटा… त्यात हेलकावणाऱ्या नावेवर जीव मुठीत धरून एकाच ठिकाणी अडकलेले पर्यटक! एखाद्या थरारपटात शोभावा असा हा प्रसंग मुंबईजवळच्या समुद्रात सोमवारी पाच जणांवर बेतला. नाविकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूच्या दाढेतून आम्ही दीड तासाने सुदैवाने बचावलो, असे यापैकी एक पर्यटक क्रिश वेलकर याने ‘लोकमत’ला सांगितले.

राघव अगरवाल याचा वाढदिवस साजरा करण्यास त्याच्या कुटुंबाने सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबईतील गेट वे आॅफ इंडियाजवळून एजंटमार्फत एक स्पीड बोट बुक केली. राघवचे आई-वडील, भाऊ आणि मित्र क्रिश वेलकर असे पाच जण वाढदिवसाची धम्माल करण्यासाठी या बोटीने अलिबागच्या किनाऱ्याकडे पाचच्या सुमारास निघाले. मात्र भर समुद्रात जाऊन बोट

इंधनाअभावी बंद पडली. दाटून येणाऱ्या अंधारात उसळत्या लाटांमध्ये अडकलेले हे पाच जण मदतीसाठी आकांत करू लागले. मात्र जवळपास मदत मिळण्याची काहीही शक्यता नव्हती. त्यातच बोटीवर जीपीएस, इमर्जेन्सी लाइट आदी सुरक्षेची कोणतीही उपकरणे नव्हती. सुदैवाने तेथे मोबाइलला रेंज असल्यामुळे त्यांना बोटीचा मालक राजेश अय्या याच्याशी संपर्क करता आला. त्याने पाच मिनिटांत मदत पोहाचविण्याचे दिलेले आश्वासन तब्बल दीड तासाने पूर्ण केले. तोपर्यंत हेलकावणाऱ्या बोटीतील पाच जणांना उलट्या- भोवळ येऊ लागली होती. डोळ्यांत प्राण आणून ते मदतीची वाट पाहात होते. त्यातच बोटीवर जीपीएस यंत्रणा नसल्याने मदतीसाठी निघालेल्यांना बोटीचा शोध घेणे अवघड झाले होते.

अखेर साडेसात वाजताच्या सुमारास एक जेस्की (पाण्यातील स्कूटर) घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आणलेले इंधन बोटीत ओतण्यात आले आणि पर्यटक जीव वाचल्याची भावना घेऊन वाढदिवस न साजरा करताच परतीच्या मार्गावर निघाले. आल्या पावली त्यांनी मुंबईचा किनारा गाठला. ‘नको तो वाढदिवस, नको ती पार्टी, जीव वाचला तेच पुरे,’ अशा मन:स्थितीत राघव आणि कुटुंबीय घरी परतले.

राघवने बुक केलेली बोट राजेश अय्या या फॅशन डिझायनरच्या खासगी मालकीची आहे. तो पर्यटकांनाही ही बोट परस्पर भाड्याने देतो. प्रवासी वाहतुकीचे कोणतेही निकष न पाळता चालणाऱ्या या धंद्यावर कुणाचाही अंकुश नाही.

इंधनाविना भरसमुद्रात अडकल्याचा फोन केल्यानंतरही राजेशने मुजोर उत्तरे दिली. ‘असे नेहमीच होत असते. त्यात काही विशेष नाही’, असे म्हणत काही वेळाने त्याने फोनही उचलणे थांबविले. झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करण्याचेही सौजन्य त्याने दाखविले नाही, असे क्रिशने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *