वरदा वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना इंटरनेट सेवेवरही याचा परिणाम झाला आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना यासंबंधी संदेश पाठवत पुढील काही दिवस इंटरनेट स्पीडवर परिणाम होईल असं सांगितलं आहे. ‘वरदा’ चक्रीवादळाने सोमवारी दुपारी वर्दी देत, चेन्नईसह तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीला धडक देत, घडविलेल्या विध्वंसात ४ जण ठार झाले असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
एअरटेलने यासंबंधी पत्रकही जारी केलं असून ‘वरदा वादळामुळे समुद्राखालील केबल्सचं नुकसान झालं आहे, यामुळे इंटरनेट स्पीडवर परिणाम होऊ शकतो. आमचे इंजिनिअर्स ही समस्या सोडवण्यासाठी आणि सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत’, असं सांगितलं आहे. एअरटेलने यासंबंधी सूचनाही पाठवली आहे.
