मुरुड समुद्रकिनाऱ्यावर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातात १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन आता मुरुड समुद्रकिनाऱ्यावर टेहाळणी मनोऱ्याची उभारणी केली जाणार आहे. १ फेब्रुवारी २०१६ रोजी मुरुड समुदकिनारी पुणे येथील इनामदार महाविद्यालयाची सहल फिरायला आली होती. समुद्रकिनारी फिरत फिरत यातील काही मुले व मुली समुद्रात पोहण्यास उतरले. अचानकपणे भरतीच्या पाण्यात ओढले जाऊन १४ विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेची दखल सर्व स्थरांतून घेण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन मुरुड समुदकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टेहाळणी मनोऱ्याची उभारणी केली जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. शासकीय विश्रामगृहाशेजारील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
मनोऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वीच जिल्ह्य़ातील सर्व समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. मनोऱ्याच्या बांधकामामुळे पर्यटकांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
