साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे

डोंबिवली येथे येत्या फेब्रुवारीत होणा-या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ काव्य समीक्षक नागपूरचे डॉ. अक्षयकुमार काळे दणदणीत मतांनी निवडून आले.

एकतर्फी झालेल्या निवडणुकीत काळे यांना ६९२ मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ठाण्यातील लेखक-कवी प्रवीण दवणे यांना केवळ १४२ मतांवर समाधान मानावे लागले.

चौरंगी लढतीमुळे या निवडणुकीकडे साहित्य विश्वाचे लक्ष लागले होते. पण विदर्भ संशोधन मंडळाचे अध्यक्ष नागपूरचे मदन कुळकर्णी केवळ २७ मते घेऊ शकले तर जयप्रकाश घुमटकर अवघ्या ३ मतांवर थांबले. नागपुरात रविवारी मतमोजणी होऊन निर्वाचन अधिकारी मकरंद अग्निहोत्री यांनी निकाल जाहीर केला.

अक्षयकुमार काळे हे मूळचे वरूड गावचे आहेत. विदर्भाचे म्हणून त्यांना विदर्भातून एकगठ्ठा मतदान झाल्याचे दिसते. साहित्य महामंडळाचे कार्यालय सध्या नागपुरात असून डॉ. श्रीपाद जोशी हे महामंडळाचे अध्यक्षपद भूषवत आहेत. या जोडीला आता संमेलनाध्यक्षपदही विदर्भाकडे आले आहे.
कवितेचे समीक्षक म्हणून ख्याती असलेले अक्षयकुमार काळे यांनी विपुल लिखाण केले आहे. सूक्तसंदर्भ, कविता कुसुमाग्रजांची, मर्ढेकरांची कविता- आकलन, ग्रेसविषयी, गालिबचे उर्दू काव्य विश्व-अर्थ व भाष्य ही त्यांची काही ग्रंथसंपदा आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह या विषयामध्ये पीएचडी घेतली आहे. काळे हे नागपूर विद्यापीठात मराठीचे विभागप्रमुख होते. त्यांच्या निवडीचे साहित्यिक विश्वात स्वागत होत आहे.

संमेलन वादविवादाशिवाय पार पडावे – अक्षय काळे

संमेलन वाद-विवादाशिवाय पार पडावे असा माझा प्रयत्न राहील, असे डोंबिवलीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी म्हटले आहे. निवडीनंतर खास मुलाखतीत बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्तकेल्या. काळे म्हणाले, संमेलन म्हटले की, वादविवाद होतात. वादाशिवाय संमेलन पार पडावे अशी माझी अपेक्षा आहे.

मराठी भाषा आणि समाजापुढे आज वेगवेगळे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी वेगवेगळी व्यासपीठे आहेत. संमेलनात साहित्यबाह्य विचार नको. साहित्याचाच विचार व्हावा. मराठी साहित्य व संस्कृतीपुढे वेगवेगळी आव्हानं उभी आहेत. अशा वातावरणात साहित्याच्या श्रेष्ठतेचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. साहित्याला महत्ता कशी लाभेल त्या दिशेने प्रयत्न अपेक्षित आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *