पैशांच्या वादातून हडपसर परिसरात चुलतभावाचा खून केला. त्यानंतर त्याच्या नावाने साथीदाराला बसप्रवासाचे तिकीट काढून दिले आणि साथीदाराला प्रवास करण्यास पाठवले. प्रवासादरम्यान नगर रस्त्यावरील रांजणगाव येथे साथीदार उतरला. दरम्यान, बेपत्ता झालेल्या तरुणाची बॅग बसमध्ये सापडली. त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली. त्यानंतर रांजणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघा आरोपींना अटक केली. आरोपींनी हिंदी चित्रपट पाहून खुनाचा कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
मिलिंद मारूती आळसपुरे (वय ३९, रा. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलतभाऊ कपिल गोपाळ आळसपुरे, त्याचा साथीदार दीपक बोरा (दोघे रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मोहारकर (वय ४०, रा. खडकी बाजार) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंदने त्याचा चुलतभाऊ कपिल याला दहा लाख रुपये शेअरबाजार आणि भिशीत गुंतवण्यासाठी दिले होते. मात्र, कपिलने पैसे परत न केल्यामुळे ते फुरसुंगी येथे कपिलला ४ डिसेंबर रोजी भेटण्यासाठी आले होते. कपिलने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कपिल, त्याचा साथीदार दीपक त्यांना घेऊन फुरसुंगीतील कालव्याजवळ गेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर राम नावाच्या साथीदाराला मिलिंदचा मोबाईल आणि बॅग घेऊन खराडी बाह्य़वळण मार्गावर पाठवले. तेथे त्याने मिलिंदच्या नावाने खासगी आरामबसच्या तिकिटाची आगाऊ नोंदणी केली. नगर रस्त्यावरील कोंढापुरी भागात आरोपी कपिलचा साथीदार प्रवाशासोबत जेवण करण्यासाठी उतरला. मिलिंदची बॅग बसमध्ये सोडून तो पसार झाला.
दरम्यान, मिलिंद घरी न पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पुण्यातील नातेवाईक मोहारकर यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली. रांजणगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी तातडीने तपास सुरू केला. मिलिंदच्या कु टुंबीयांकडे चौकशी करण्यात आली. पुण्यात राहणारा चुलतभाऊ कपिल याला भेटण्यासाठी तो आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कपिलला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला कपिलने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चुलतभाऊ मिलिंद याचा पैशांच्या वादातून खून केल्याची क बुली दिली. ‘दृश्यम’ नावाचा हिंदी चित्रपट पाहून चुलतभावाच्या खुनाचा कट आखल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. कपिल आणि त्याचा साथीदार दीपक याला पकडून हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहाय्यक निरीक्षक सुनील क्षीरसागर, राजू मोमीन, चंद्रकांत काले, अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, मंगेश थिगळे, धवाटे, शिंदे यांनी तपास करून गुन्ह्य़ाचा छडा लावला.
