आरेला हात लावाल तर खबरदार; निसर्गप्रेमींचे आज आंदोलन

मुंबईसारख्या शहराच्या विकासासाठी मेट्रो ३ यायला हवी, शहराचा विकास व्हायला हवा, पण या विकासात शहरातील वनसंपत्ती, वन्यजीवसृष्टी धोक्यात येत

असल्यास, पर्यावरणवाद्यांचा याला शेवटपर्यंत कडाडून विरोध असणार आहे. आरे कॉलनीत मेट्रो ३ प्रकल्पाची शेड बांधल्यास, येथील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी निसर्गप्रेमी सोमवार, १२ डिसेंबर रोजी आरे कॉलनीत सकाळी १० वाजता आंदोलन करणार आहेत.

केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्रालय यांनी आरेतील १६५ हेक्टर जागा ‘इको सेंसेटिव्ह झोन’ जाहीर केल्यानंतर, हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. आरे कन्झर्वेशन ग्रुप, सेव्ह आरे, अपना मुंबई अभियान (वनशक्ती, ग्रीनलाइन, सेव्ह आरे फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट, दहिसर लिंक रोड रेसिडंट फॉरम, येरुर एन्व्हायरमेंट सोसायटी) या सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन, आरेतील वनसंपत्ती बचावासाठी शांततेत आंदोलन करणार आहेत. या सर्व संघटनांनी मिळून सरकारला अनेकदा पर्यायी जागा सुचवल्या आहेत, पण त्याकडे सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी दिली. अनेकदा विविध प्रकारे आंदोलने केली. सरकारशी पत्रव्यवहार केला, पण अजूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सोमवारीही शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार आमचे ऐकेल, असे आम्हाला वाटते. आरे वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत राहणार असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांची संख्या अधिक असून, बिबट्यांचा येथे वावर आहे. मोठ्या प्रमाणात वनस्पती आहेत. हा इतकाच भाग आता शहरात हिरवळीचा राहिलेला आहे. मेट्रो ३ ची शेड येथेच बांधल्यास, या सर्व संपत्तीला धोका निर्माण होणार आहे. ही संपत्ती वाचायला पाहिजे. आरे वाचावे, यासाठी हजारो व्यक्तींनी पत्र लिहिली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आरे वाचवण्याचा लढा सुरू आहे, पण अजूनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. वन्य जीवन वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड सरकार दुर्लक्षित करत आहे. मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहाण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता आहे. याच पट्ट्यामुळे आॅक्सिजन मिळू शकतो. त्यामुळे आरे वाचले पाहिजे, असेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *