साडेसहा वर्षांत २०९ पोलिसांच्या आत्महत्या

पोलिसांच्या प्रलंबित समस्या व कामाचा ताण दूर करण्याची ग्वाही राज्यकर्ते व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार दिली जात असली, तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालल्याने, त्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रकारामुळे स्पष्ट झाले

आहे. गेल्या साडे सहा वर्षांमध्ये तब्बल २०९ खाकी वर्दीवाल्यांनी स्वत:च आपल्या आयुष्याला संपवले आहे. यामध्ये अधिकाऱ्यांची संख्या ३९ आहे, तर गेल्या अडीच वर्षांत ७९ जणांनी आणि दहा महिन्यांत तब्बल १८ जणांनी सेवेत असताना, आपल्या आयुष्याचा अंत करून घेतला आहे. त्यामुळे सरकार बदलले, तरी पोलिसांवरील ताण वाढत राहिला असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने पोलिसांच्या ‘आॅन ड्युटी’ आत्महत्यांचा अहवाल सीआयडीकडून प्राप्त केला आहे. ‘लोकमत’ला त्याची प्रत उपलब्ध झाली असून, त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. बहुतांश घटनांमागे बंदोबस्त, कामाचा अतिरक्त ताण, वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आणि कौटुंबिक कलह असल्याचे, त्याबाबत केलेल्या तपासातून पुढे आल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या बिरुदावलीने राज्यातील अकरा कोटींवर नागरिकांच्या वित्त व जीविताच्या हमीसाठी २ लाखांवर पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. मात्र, वाढते मनुष्यबळ व शस्त्रसामुग्रीबरोबरच खात्यांतर्गत संदोपसंदी, गटबाजी वाढत राहिली आहे. अवेळी, सलगपणे करावी लागणारी ड्युटी, विविध प्रकारच्या बंदोबस्त हक्कामुळे साप्ताहिक सुट्टीवर येणारी गदा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनमानी, असे अनेक घटक यास कारणीभूत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *