मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार आणि मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू (७८) यांचे रविवारी सकाळी ६.२० वाजता खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा प्रभू, मुले

राजेंद्र आणि अरविंद, मुलगी नीना, जावई कृष्णा हेगडे व नातवंडे असे कुटुंब आहे. विलेपार्ले पूर्वेकडील हनुमान रोड येथे रमेश प्रभू वास्तव्यास होते.

गेल्या काही महिन्यांपासून प्रभू आजारी होते. त्यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू होते. आठवडाभरापूर्वी त्यांना बरे वाटू लागल्यानंतर, विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांना आणण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, त्यांना पुन्हा फोर्टीसमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे अवयव निकामी झाल्याने ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सकाळी त्यांचे पार्थिव प्रथमत: त्यांच्या निवासस्थानी आणि नंतर प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, माजी खासदार प्रिया दत्त, ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, आमदार पराग अळवणी, संन्यास आश्रमचे विश्वेस्वरानंद महाराज, माजी आमदार गुरुनाथ देसाई, माजी आमदार अभिराम सिंग, माजी आमदार सीताराम दळवी, माजी आमदार अशोक जाधव, माजी उपमहापौर अरुण देव, नगरसेविका विनी डिसोझा, माजी नगरसेवक शशिकांत पाटकर आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

रमेश प्रभू यांच्या पार्थिवावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत रविवारी दुपारी १.२५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विलेपार्ले येथील नागरिक उपस्थित होते.

क्रीडा प्रेमी असलेल्या रमेश प्रभू यांनी पार्ल्यात प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची स्थापना केली.  २००० साली जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिल्पसमूह त्यांनी उभारले. रमेश प्रभू हे प्रथमत: १९७३ साली विलेपार्ले येथील नगरसेवक झाले. १९८७-८८ मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. १९८७ साली विलेपार्ले येथील काँग्रेसचे माजी आमदार हंस भृंगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत, दिवंगत प्रभाकर कुंटे यांचा पराभव करून प्रभू हे विलेपार्ले येथून आमदार म्हणून विजयी झाले. १९९० साली झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून विलेपार्ले येथून विजयी झाले होते.

११ डिसेंबर १९९५ साली सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हिंदुत्वावर निवडणूक लढवून, आमदार झाल्याबद्दल त्यांना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षे मतदान करण्यास व निवडणूक लढवण्यास बंदी घातली. त्यानंतर, त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *