नाशिकमध्ये दोन हजारच्या अडीच कोटींच्या नोटा जप्त

नाशिकमध्ये दोन हजार रुपयांच्या अडीच कोटी रुपये मूल्याच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्राप्तीकर विभागाने रविवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देणाऱ्या शहरातील दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राप्तीकर कार्यालयात त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिकमध्ये जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या दोन हजारच्या नोटा दिल्या जात असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून दोघा संशयितांशी बनावट ग्राहक बनून संपर्क साधला. सौदा ठरल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. त्यानुसार अडीच कोटी रुपयांचे जुने चलन बदलून देण्यासाठी आलेल्या त्या दोघांना दोन हजारच्या नव्या नोटांसह ताब्यात घेण्यात आले.

या संशयितांपैकी एक शहरातील अध्यात्म गुरू असून एका धार्मिक संस्थानचे ते विश्वस्त आहेत. तर दुसरा एका संघटनेचा स्वयंघोषित पदाधिकारी, दारूबंदीसाठी पुढाकार घेणारा कार्यकर्ता आणि शासकीय ठेकेदार असल्याचे समजते. या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त शहरात पसरताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्राप्तीकर कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे तत्काळ पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *