हेल्मेट घालून दुचाकी चालवा आणि अपघात घडल्यास जीवाचं रक्षण करा, असा बहुमोल सल्ला पोलिस तसंच प्रशासनातर्फे नेहमी दिला जातो. अर्थातच हा सल्ला नागरिकांच्या हितासाठीच असतो. मात्र राजस्थानमधील एका भाजप आमदार महाशयांनी हेल्मेटधारकांची खिल्ली उडवत अशा व्यक्ती मूर्ख असल्याची मुक्ताफळं उधळली आहेत.
राजस्थानमधल्या कोटा लाडपुराचे आमदार भवानी सिंह राजावत हे हेल्मेट धारण करणाऱ्यांच्या विरोधात आहेत. कोटामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यशाळेत त्यांनी याच विषयावर बोलताना अकलेचे तारे तोडले. हेल्मेटची उपयुक्तता सांगितली जाणं अपेक्षित असताना आमदार महाशयांनी मात्र उलटीच गंगा वळवली.
हेल्मेटच्या सक्तीबाबत असलेली कार्यशाळा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. हेल्मेटधारक मूर्ख असतात’ असं राजावत म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अनेक बडे पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

