दिल्ली सरकारने बनावट कागदपत्रे देणाऱ्या टोळीचा शोध घेतला असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
दक्षिण दिल्लीतील साकेत परिसरात एक बनावट कागदपत्रे देणारी टोळी कार्यरत असल्याबाबत या परिसरात अलिकडेच सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेतील माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी संबंधित परिसरात धाड टाकली. यावेळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र आदीच्या मागणीसाठी भरण्यात आलेले अर्ज आढळून आले. कारवाईदरम्यान इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ रस्त्यावरील सैदुलाजब येथील इमारतीच्या एका मजल्यावर विविध जिल्ह्याशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. तसेच वितरणाच्या प्रतिक्षेत असलेली खरीखुरी वाटावीत अशी तयार झालेली बनावट कागदपत्रेही आढळून आली. इतर मागासवर्गीय गटातील प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले 1988 चे एक वीज देयक तसेच त्यासाठी आवश्यक ते इतर पुरावेही यावेळी आढळून आली आहेत. तसेच कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी वापरण्यात येत असलेले बनावट स्वाक्षरींसह इतर शिक्केही यावेळी आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गोविंद राम आणि अमित यांना ताब्यात घेतले आहे.
