दादरमधून नव्या नोटांसह ८५ लाख जप्त

दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात इनोव्हा कारमधून गुन्हे शाखेने शुक्रवारी ८५ लाख रुपयांची रोकड जमा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचे ७२ लाख आणि १०० रुपयांच्या नोटांचे १३ लाख रुपये आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ४० ते ५० टक्क्यांच्या कमिशनवर हा सौदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दक्षिण मुंबईतील व्यापारी हरेश शहासह पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दादर पश्चिमेकडील बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात एका इनोव्हा कारमधून एक करोड रुपयांच्या नव्या नोटा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. जुन्या नोटांच्या बदल्यात या नव्या नोटा देण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष ५ चे वरिष्ठ निरीक्षक अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. या वेळी संशयास्पदरीत्या आलेली इनोव्हा कार पोलिसांना दिसली. या कारची झडती घेतली असता, प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना ८५ लाख रुपयांची रोकड हाती लागली. त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचे ७२ लाख रुपये तसेच १०० रुपयांच्या नोटांचे १३ लाख रुपये होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *