साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

  • चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेलेल्या साडेचार वर्षांच्या बालिकेशी एका तरुणाने लैंगिक चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार सीएसटीजवळील सेंट जॉर्ज हॉस्पिटल कामगार वसाहतीत घडला आहे. याप्रकरणी आरिफ महंमद (वय २५) याला एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली असून संबंधित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    दरम्यान, याबाबत संबंधित तरुणावर कडक कारवाई करुन रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा लीलाबाई लाड यांनी पोलीस व प्रशासनाकडे केली आहे. त्याबाबत मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील सफाई कामगाराची बहिण तिच्या तीन मुलींसह गेल्या तीन महिन्यांपासून एका मुलीच्या उपचारानिमित्त भावाच्या हॉस्पिटल परिसरात असलेल्या धोबी घाट क्वार्टर्समध्ये राहत आहे. तिची दोन नंबरची साडेचार वर्षांची मुलीने शनिवारी सायंकाळी खाऊसाठी पैसे देण्याचा हट्ट केल्या. त्यामुळे महिलेने दोन रुपये दिल्यानंतर ती समोर असलेल्या दुकानात गेली असता तेथे असणाऱ्या आरिफ महंमद नावाच्या तरुणाने तिला बाजूला नेऊन लैंगिक चाळे केले. दीड तासाने घरी परतल्यावर तिने आईला रक्त येत असल्याचे सांगितले. डॉक्टरांकडे तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. (प्रतिनिधी)

    >आंदोलनाचा सफाई कामगारांचा इशारा

    हॉस्पिटल सफाई कामगाराच्या वसाहतीत हा प्रकार घडल्याने त्यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित तरुणावर तीव्र कारवाई करण्यासाठी त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबत सफाई मजूर संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा लीलाबाई लाड यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाणे व रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन दिले आहे. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *