मुंबईतील निळ्या जीन्सचा काळा धंदा ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर, हा अवैध व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणातील आणखी काळे धंदे शोधले असता, हजारो जीन्स रोज धुऊन त्यांना रंग लावण्यासाठी लागणारे लाखो लीटर पाणी, जीन्समाफिया मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एकीकडे मुंबईत अनेक भागांमध्ये पाण्याअभावी लोकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे मात्र, ‘यहाँ सबको मॅनेज करना पडता है…’ असे म्हणत पाण्याची चोरी सुरू आहे. एका कारखान्यात दिवसाला दोन ते तीन हजार लीटरहून अधिक पाणी लागते. कामाठीपुरा परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या १५० ते २०० जीन्सच्या कारखान्यात रोज लाखो लीटर पाण्याची चोरी सुरू आहे. ही चोरी रोखणे दूरच, पालिकेचे अधिकारी त्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसून आले, तसेच या जीन्ससाठी मुंब्रा येथून केमिकलचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात असल्याची माहिती हाती लागली आहे.
कामाठीपुरा परिसरात पूर्वीपासून असलेल्या शाळा, दुमजली इमारती, पगडी चाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन करत, शासनाने ही घरे रिकामी केली होती. स्थानिक गुंड आणि राजकारण्यांनी या रिकाम्या बांधकामांवर कब्जा मिळवत, हे अवैध कारखाने चालवले जात आहेत. कारखान्यांना लागूनच राहणाऱ्या रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. या परिसरात दिवसातून अर्धा ते एक तास पाणी येते, तेदेखील कमी दाबाने. मात्र, जीन्सचा अवैध धंदा करणाऱ्यांसाठी पाण्याची २४ तास ‘सेवा’ सुरू आहे.
>पाणीचोरीवर कारवाई होते, पण तात्पुरती
पालिका प्रशासनाकडे पाणीचोरीबाबत पाठपुरावा केल्यानंतर १० मार्चला ४२ जीन्स कारखान्यांतील पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले. मात्र पालिकेच्या या तात्पुरत्या कारवाईनंतर पुन्हा पाण्याची चोरी सुरुच आहे.
ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर २ जून रोजी येथील चंद्रमनी बुद्धविहार मार्गातील ५, ७, ९ आणि १२ व्या गल्लीतील जलजोडणी खंडित करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
>कामाठीपुऱ्यात २०० अवैध कारखाने : कामाठीपुऱ्यात सुमारे २०० छोटे- मोठे अवैध कारखाने असून.प्रत्येक व्यापाऱ्याने जुन्या जीन्स धुणे, त्यांना रंग देणे, त्यानंतर त्या पुन्हा धुणे यासाठी २०५ लिटरचे १० ते १२ ड्रम ठेवले आहेत