नोटाबंदीनंतर पुरेशा प्रमाणात नव्या ५०० व दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध नसताना, रिझर्व्ह बँकेने लवकरच ५० व २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याचे रविवारी जाहीर केले. शंभरच्या जोडीला या नोटा आल्यावर खास करून लहान चलनाची सध्या जाणवणारी तीव्र टंचाई कमी होईल.
रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार २० व ५० रुपयांच्या नव्या नोटा सन २००५ पासून काढण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिकेमधीलच नोटा असतील. त्यांच्यावर नवे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. रंगसंगती, छपाई इत्यादी बाबी पूर्वीसारख्याच असल्या, तरी ५० रुपयांच्या नव्या नोटांच्या अनुक्रमांकांत कोणतेही इंग्रजी अद्याक्षर नसेल. २० रुपयांच्या नोटांच्या अनुक्रमांकांत ‘एल’ हे इंग्रजी अद्याक्षर असेल. दोन्ही नोटांच्या मागील बाजूस छपाईचे २०१६ हे वर्ष छापलेले असेल. या नव्या नोटा आल्या, तरी आधीपासून चलनात असलेल्या २० व ५० रुपयांच्या नोटाही सुरू राहतील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.