लग्नात आनंद साजरा करण्यासाठी करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये 25 वर्षीय डान्सरचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील भटिंडा येथे घडली आहे. कुलविंदर कौर असं या तरुणीचं नाव असून ती गर्भवती होती. गोळी लागल्यानंतर कुलविंदरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नव-यामुलाच्या मित्राने ही फायरिंग केली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कुलविंदरचा पती हरजिंदर सिंह याने नव-यामुलाचा मित्र बिल्ला याने ही फायरिंग केल्याचा आरोप केला आहे. ‘कुलविंदरला स्टेजवरुन उतरुन आपल्यासोबत नाचण्याची ते मागणी करत होते, पण तिने नकार दिल्याने त्यांनी गोळीबार केला’, असा आरोप हरजिंदर सिंहने केला आहे.
कुलविंदरच्या ग्रुपमध्ये चार डान्सर्स होते. लग्नातील कार्यक्रमात नाचण्यासाठी त्या आल्या होत्या. डान्स करत असताना गोळी लागल्यानंतर कुलविंदर स्टेजवरच कोसळली. पोस्टमॉर्टम आल्यानंतरच नेमकी माहिती समोर येईल असं पोलीस अधिकारी दलजित सिंह यांनी सांगितलं आहे. बिल्लाचा पोलीस शोध घेत असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.