अभिनेत्री श्वेताच्या घरी चिमुकल्याचे आगमन

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. श्वेताने मुलाला जन्म दिला आहे. जवळपास तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर श्वेता आणि अभिनवने २०१३ साली विवाह केला होता. मुंबईतील सुर्या चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये श्वेताने २७ नोव्हेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला.

इंडियन एक्स्प्रेस या संकेतस्थळाशी बोलताना अभिनव कोहली म्हणाला की, आम्ही खूप खूश आहोत. आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. आम्हाला मुलगा झाला आहे. बाळाची तब्येत उत्तम असून त्याचा जन्म २७ नोव्हेंबरला झाला. आम्ही शनिवारी श्वेता आणि बाळाला घरी घेऊन जाणार आहोत. बाळाचे नाव अजून तरी आम्ही ठरवलेले नाही. सुर्या चाइल्ड केअर हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ शोभा शर्मा म्हणाल्या की, बाळ अगदी सुदृढ असून त्याची प्रकृती उत्तम आहे.

श्वेता आणि अभिनवचे हे पहिलेच बाळ आहे. श्वेता टेलिव्हिजन विश्वात प्रसिद्ध असून ती बिग बॉस ४ ची विजेती राहिली आहे. कसौटी जिंदगी की, कॉमेडी सर्कस का नया दौर आणि बेगुसराई या मालिकांसाठी श्वेता विशेष करून नावाजली जाते. काही दिवसांपूर्वीच कुटुंबिय आणि टेलिव्हजन क्षेत्रातील जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत श्वेताचे बेबी शॉवर (ओटभरणी) करण्यात आले होते. श्वेताला पहिल्या पतीपासून पलक ही १५ वर्षांची मुलगी आहे. राजा चौधरीशी घटस्फोट झाल्यानंतर श्वेताने अभिनवसोबत संसार थाटला. इन्स्टाग्रामवर श्वेताचे बेबी बम्पसोबतचे अनेक फोटो पाहावयास मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *