पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विमान तांत्रिक कारणांमुळे रात्री ४० मिनिटे आकाशात एकाच जागी स्थिर होते. बुधवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या विमानातील हा बिघाड कट कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळेच विमानातील बिघाड ममता बॅनर्जी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप तृणमूलकडून करण्यात आला आहे.
तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी एका खासगी विमानातून प्रवास करत होत्या. त्यांच्या विमानाने पाटण्याहून संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी आकाशात उड्डाण केले. ममता बॅनर्जी यांच्या विमान उड्डाणाला १ तास उशीर झाला.
काही तांत्रिक कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांचे विमान आकाशात एकाच जागी स्थिर होते. अखेर ममता बॅनर्जी यांचे विमान नऊ वाजता विमानतळावर उतरले. विमान उड्डाण क्षेत्रात अशा घटना सातत्याने घडतात, असे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना कट कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. ‘हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने विमानाला हिरवा सिग्नल देण्यास उशीर केला. वैमानिक वारंवार विमानातील इंधन संपत असल्याची सूचना देत असूनही नियंत्रण कक्षाकडून विलंब करण्यात आला,’ असा आरोप पश्चिम बंगालचे शहर विकास मंत्री फिरहाद हकीम यांनी केला आहे.
‘या घटनेमुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ही घटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संपवण्याच्या कारस्थानाचा भाग आहे. ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात देशभरात प्रवास करुन सरकारच्या निर्णयाचा निषेध करत आहेत. त्यामुळेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे,’ असा गंभीर आरोप फिरहाद हकीम यांनी केला आहे.
