नाशिकमधील शिवाजी चौकात भररस्त्यात स्कूल व्हॅनने पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. वाहनाने पेट घेतला त्यावेळी गाडीत सुमारे १५ ते १७ विद्यार्थी बसले होते. मात्र वाहनचालक आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानाने या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका झाली आणि पुढील अनर्थ टळला.
शिवाजी चौकमध्ये शिवाजी पुतळ्याजवळून एक स्कूल व्हॅन जात होती. या दरम्यान गाडीतून धूर निघू लागला. वाहनचालकाला हा प्रकार वेळीच लक्षात आला आणि त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर स्थानिकांच्या मदतीने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवण्यात आले. विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याच्या काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. वेळीच विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. अग्निशमन दलाच्या पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. गाडीतील गॅस कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.मात्र या घटनेमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
