२५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या पात्र वारसास ठाणे महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या माध्यमातून विनामूल्य सदनिका दिल्या आहेत. एकूण २९० पात्र लाभार्थी असून त्यापैकी २३४ लाभार्थ्यांना चावीवाटपाचा कार्यक्र म बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात पार पडला. सफाई कामगारांना मालकी हक्काने विनामूल्य घरे देणारी ठाणे महानगरपालिका ही राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केले. तसेच नियोजित वेळेत प्रकल्प झाल्याबद्दल शिंदे यांनी महापौर संजय मोरे, आयुक्त संजीव जयस्वाल, तसेच सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
