पेट्रोल पंपावर आणि विमान तिकीटासाठी शुक्रवारपर्यंतच म्हणजे 2 डिसेंबपर्यंतच 500 ची जुनी नोट वापरता येऊ शकते. शुक्रवारपर्यंतच या ठिकाणी जुन्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर या नोटा वापरणं शक्य होणार नाही आहे. याआधी 15 डिसेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याची मुभा होती, मात्र ही मुदत कमी करत 2 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. पेट्रोल पंपांवर जुन्या नोटासाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्यानं केंद्र सरकारने तातडीने निर्णय मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे. तसंच सरकारकडून टोल नाक्यांवर देण्यात आलेली उद्या मध्यरात्रीपासून संपुष्टात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही ठराविक ठिकाणी जुन्या नोटा वापरण्याची मुभा होती. सरकारने महत्वाची ठिकाणं ज्यामध्ये हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, औषध दुकानं, इत्यादी ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. ही मुदत 24 नोव्हेंबरपर्यंतच होती. पेट्रोल पंप आणि विमान तिकीट खरेदीसाठी ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता केंद्र सरकारने निर्णय मागे घेत उद्यापासूनच नोटा स्विकारणं बंद करण्यास सांगितलं आहे.
यानंतर बँकेत जाऊन जुन्या नोटा बदलून घेणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असेल. मात्र त्यासाठीही 30 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.
