UPSC टॉपर टीना-अतहरच्या लग्नात लव्ह जिहादचं विघ्न

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेत टॉपर ठरलेले टीना दाबी आणि आमीर-उल-शफी खान यांच्या लग्नात विघ्न आलं आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने या लग्नाला विरोध केला असून टीना दाबीच्या आई-वडिलांना पत्र लिहून लग्न रद्द करण्यास किंवा आमीरला धर्मांतर करण्यासाठी मनवण्यास सांगितलं आहे. युपीएससी परीक्षेत भारतात पहिली येणारी टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर आमीर-उल-शफी खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. स्वत: टीना दाबीने फेसबूकवरुन ही माहिती दिली होती.
‘तुमच्या कुटुंबाचा हा निर्णय लव्ह जिहादला बढती देत असून हे लग्न कोणत्याही परिस्थितीत नाही झालं पाहिजे. पण तरीही दोघे लग्न करणार असतील तर आमीरची घर वापसी केली पाहिजे. धर्मांतर करण्यास तो तयार होत असेल तरच लग्न करुन द्यावं. आणचे सदस्य घर वारसी किंवा धर्मांतरासाठी मदत करतील’, असं पत्रात लिहिण्यात आलं आहे.
 टीनाचे वडिल जसवंत दाबी यांनी उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलं आहे. ‘टीनाने युपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे आम्हा सर्वांना आनंद झाला. पण तिने आमीरशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय आम्हा सर्वांसाठी धक्का असून आम्हाला दुख: झालं आहे. तुमच्या माहितीसाठी मुस्लिम लोक लव्ह जिहादला बढती देत असून हिंदू मुलींना आपल्या प्रेमात पाडून धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत. पण जर त्यांना लग्न करणं इतकं महत्वाचं असेल तर आमीरचे घर वापसी केली पाहिजे’, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
टीना दाबी ही दलित समाजातील असून अतहर काश्मीरी मुसलमान आहे. अतहर हा काश्मीरमधील छोट्या गावातून आलेला आहे. तर टीनाचं बालपण दिल्लीतच गेलं आहे. लग्नाची माहिती खुद्द टीनाने दिली होती. ती म्हणाली की, ‘ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी आमची भेट झाली. त्याच्यवेळी पहिल्याच नजरेत प्रेम झालं होतं. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तारीख अजून ठरलेली नाही. मात्र लवकरच साखरपुडा करणार आहोत’.
‘मला माझ्या निवडीचं स्वातंत्र्य आहे. मी जे निवडलं आहे त्याचा आनंद आहे आणि आमीरलादेखील. आमच्या कुटुंबियांनाही आमच्या निर्णयाचा आनंद आहे. समाजात काही घटक असतात, ते अल्पसंख्यांक जे तुम्ही दुस-या धर्मातील व्यक्तीसोबत संबंध निर्माण केल्याबद्दल तुमच्याविरोधात नकारात्मक टिप्पणी करतात’, असं सांगत टीना दाबीने आपला निर्णय मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *