नागरोटा येथे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी दाखविलेल्या धाडसामुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे नागरोटा लष्करी तळावर हल्ला केला होता. याठिकाणी लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात सीमारेषा पार करुन लष्कर तुकडीत प्रवेश मिळवला होता. लष्करी मुख्यालयापासून फक्त तीन किमी अंतरावर दहशतवादी होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना ओलीस ठेवून भारतीय सैन्याला वेठीस धरण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. मात्र, दोन जवानांच्या पत्नींनी प्रसंगावधान राखून हा डाव उधळला. दोन्ही जवान रात्रपाळीवर असल्याने त्यांच्या पत्नी नवजात बालकासोबत घरी एकट्या होत्या. यावेळी दहशतवादी लष्करी अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या एका इमारतीमध्ये शिरले. ही गोष्ट या जवानांच्या पत्नींच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी अजिबात न घाबरता शौर्याचं अनुकरणीय प्रदर्शन दाखवलं आहे. दहशतवाद्यांना हेडक्वार्टर्समध्ये प्रवेश करता येऊ नये यासाठी त्यांनी घरातील सामान आणून गेट बंद करुन टाकला. यामुळे दहशतवादी घुसू शकले नाहीत आणि त्यांचा कट फसला. जर महिलांनी वेळीच हे धाडस दाखवले नसते तर कदाचित दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले असते. ज्यामुळे लष्कर आणि त्यांच्या कुटुबाचं मोठे नुकसान करण्यात यशस्वी झाले असते, अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने दिली.
दहशतवादी लष्कर जवान आणि त्यांचं कुटुंब राहत असलेल्या दोन इमारतींमध्ये घुसले होते. त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न होणार होता. परिस्थितीची तात्काळ माहिती घेण्यात आली आणि बचावकार्याला सुरुवात करत सर्वांना वाचवण्यात आले, ज्यामध्ये १२ जवान, दोन महिला आणि त्यांची नवजात बालकं होती, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दहशतवादी इमारतीत शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, या बचावकार्यादरम्यान भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले.
नागरोटा येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील नांदेड येथील जवान संभाजी यशवंत कदम व पंढरपूर येथील कुणाल मुन्ना गोसावी हे शहीद झाले आहेत. कदम त्यांच्या मागे आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. कदम यांचे लोहा तालुक्यातील जानापुरी हे गाव. पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मुन्ना गोसावी यांचे कुणाल हे वीरसुपुत्र होत. दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती कळताच नांदेड व पंढरपूरसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी सेवा बजावत असलेले कदम व गोसावी यांच्यासह अन्य जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारादरम्यान कदम व गोसावी धारातीर्थी पडले.
