इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना मिळाला बंगला ;नीता ठाकरे ठरल्या पहिल्या मानकरी

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना अधिकृत बंगला मिळाला आहे. आनंदनगर-सिव्हिल लाइन्स परिसरातील ‘राजगृह’ बंगल्याच्या चाव्या प्रशासनाने महापौर नीता ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केल्या. उपराजधानीतील महापौरांना स्वतंत्र बंगला असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लावून धरली होती, हे विशेष.

बंगला असावा, अशी मोहीम ‘मटा’ने सुरू केली होती.

मुंबईत महापौरांसाठी बंगला आहे. पुण्यातही ही सुविधा आहे. इतकेच नव्हे, तर अमरावतीसारख्या शहरातही महापौरांना बंगला उपलब्ध आहे. मात्र, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महापौरांसाठी अधिकृत निवासस्थान नव्हते. देश-विदेशातून येणाऱ्या प्रतिनिधींशी महापौरांना कधी कार्यालयात, तर कधी स्वतःच्या निवासस्थानी भेटावे लागत होते. त्यामुळे उपराजधानीच्या प्रतिष्ठेला साजेसा महापौर बंगला असावा, अशी मोहीम  केलीहोती. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला.

हा शहराचा सन्मान : दटके

महापौरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असतो. १९५२ ते २०२२ या काळात नागपूरला ५४ महापौर लाभले. नीता ठाकरे या ५५व्या महापौर आहेत. महापौरांना बंगला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. महापौरांना अधिकृत बंगला मिळणे हा शहराचा सन्मान आहे, अशी भावना आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केली.

आनंद झाला

माझ्या कार्यकाळात महापौरांना बंगला मिळाला , याचा नक्कीच आनंद आहे. महापालिकेपासून जवळ असल्याने बैठका घेणे आणि कामकाज करणे अधिक सोयीचे होईल. मात्र या बंगल्यात पूर्णपणे स्थलांतर करणार नाही. ज्या भागांत माझे मतदार आहेत , तेथेच कायमस्वरूपी मुक्काम असेल. बंगल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून , येत्या आठ दिवसांत बंगल्यात प्रवेश करेन , असे महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *