तब्बल २४ वर्षानंतर सुधीर मेहता याला ७०० कोटीच्या घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आले आहे. सुधीर मेहता हा शेअर घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार हर्षद मेहता याचा भाऊ आहे. सुधीर मेहतासह बँकेचे अधिकारी व स्टॉक ब्रोकरच्या पाच अधिकार्यांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायाधीश शालिनी फणसाळकर यांनी हा निर्णय दिला आहे.
१९९२ साली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान या काळात आम्हाला मानसिक त्रास व शारिरीक त्रास झाल्याने आम्हाला माफ करण्यात यावे, अशी मागणी आरोपींनी केली होती पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
न्यायालयाने सांगितले की, गत २४ वर्षे आरोपींना त्रास झाला आहे हे मान्य पण हा गुन्हा गंभीर असल्याने त्यांना माफ करता येणार नाही. या प्रकरणामुळे अर्थव्यवस्थाच ढासळली असल्याची प्रतिक्रीया न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणात आरोपींना ६ महिने ते ४ वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
