विविध पर्यटनस्थळे पालथी घालण्याच्या इराद्याने भारतात आलेले एक कोलंबियन दांम्पत्य नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या आग्र्यामध्येच अडकून पडले आहे. स्टीफन गोमेझ (४०) आणि अॅक्सांड्रा फोरेरो (३४) हे जोडपे नोटाबंदीचा निर्णय होण्याच्या काही दिवस आधी भारतात दाखल झाले.
विमानतळावर त्यांनी डॉलर बदलून लाखो रुपयांची कॅश घेतली. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांच्याकडच्या पैशांचे मुल्य शून्य झाले. आता त्यांच्याकडे फक्त ५०० रुपयांचे वैध चलन शिल्लक राहिले आहे. कोलंबियात बोगोता येथे हे जोडपे रहाते.
भारतात माझे बँक खाते नाही. भारतात आल्यानंतर चार दिवसातच एका सकाळी माझ्याकडे असलेल्या पैसा उपयोगाचा नसल्याचे मला समजले. काही दिवस क्रेडिट कार्डनी व्यवहार केला पण ते ही आता बंद झाले आहे असे गोमेझ यांनी सांगितले. ४ नोव्हेंबरला हे जोडपे भारतात दाखल झाले होते.
एटीएममध्ये पैसा नाही. बँकांच्या बाहेर रांगा आहेत. परदेशी पर्यटकांना दिवसाला फक्त ५ हजारापर्यंत रक्कम बदलून मिळते. अनधिकृत चलनाच्या नावाखाली लोक आमच्याकडून जास्त पैसे उकळत आहेत. नोटाबंदीनंतर मला २० हजार रुपये खर्च करता आले. पण माझ्याकडे असलेले चलन स्वीकारावे यासाठी मला १० ते १५ टक्के जास्त रक्कम मोजावी लागली.
पाचवर्षातील ही माझी दुसरी भारत भेट होती. आता माझ्याकडे अन्नासाठीही पैसे नाहीत. मला पैसे बदलून मिळाले तर मी इथे राहू शकतो अन्यथा घरी परत जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही असे गोमेझ यांनी सांगितले.
