पुणे मेट्रो प्रकल्पास अर्थ खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर, सोमवारी नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला. नगरविकासकाकडून मेट्रोच्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करून, तो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने, मेट्रोच्या मंजुरीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. गेली वर्षभर केंद्राकडे मंजुरीसाठी असलेल्या पुणे मेट्रोला दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळीची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर या प्रस्तावाला नगरविकास खात्याची मंजुरी मिळून, तो अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. अर्थ खात्याची मंजुरी मिळावी, यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी गत आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार, अर्थमंत्रालयाच्या मंजुरीनंतर सोमवारी हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आल्याचे खासदार शिरोळे यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविले जाणारे प्रस्ताव नगरविकास विभागाकडून जातात, त्यानुसार मेट्रोचा प्रस्ताव तयार होऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाणार आहे. तेथे हा प्रस्ताव सादर होऊन, त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा आणि त्याचबरोबर भाजपच्या प्रचाराचाही नारळ फुटणार असल्याचे स्पष्ट आहे.
