ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील रामनगर परिसरात असलेल्या शासकीय तंत्र निकेतन (आयटीआय) मधील एकाच विषयात नापास झालेल्या सुमारे 450 विद्यार्थ्यांच्या पेपर पुनर्तपासणीचे प्राचार्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी सोमवारी दुपारी कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी अज्ञात विद्यार्थ्यांवर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट येथील शासकीय तंत्र निकेतनमध्ये तब्बल 500 विद्यार्थी शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी अन्य परीक्षेत उत्तीर्ण झाले, मात्र नुकत्याच झालेल्या सहामाहीच्या परीक्षेत 500 पैकी केवळ 25 विद्यार्थी पास झाले,तर उर्वरित सर्व विद्यार्थी हे एकाच विषयात नापास झाले. थिअरी विषयात नापास झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे वर्ष यामुळे टांगणीला लागल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे धाव घेतली होती. 18 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या बाजूने राष्ट्रावादीतर्फे प्रचार्यांसमोर म्हणणे मांडण्यात आले. त्यावेळी दूरध्वनीवरून प्राचार्यांनी मुलांच्या तक्रारीची आणि आंदोलनाची दाखल घेत पेपर पुनर्तपासणी करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र या घटनेला 10 दिवस झाले तरी पेपरच्या पुनर्तपासणीत टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आले. प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मुंबईत असल्याचे सांगितले, मात्र काही वेळातच ते कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. अभिजित पवार आणि समर्थकांनी हातात दांडके घेऊन कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकाने विरोध केल्याने त्यांनी इमारतीच्या काचांची तोडफोड केली. याप्रकरणी प्राचार्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी तोडफोड करणार्या अभिजित पवार याच्यासह 4 ते 5 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.
