ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे ठाणे – वाशी रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे वाशीहून ठाण्याला जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत.
आज सकाळी टिटवाळ्याजवळ रेल्वेला विद्युत प्रवाह करणारी ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मध्ये रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे समजते.
रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी टिटवाळा-कल्याण दरम्यान केडीएमसीकडून विशेष बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
