नोटाबंदीचा निर्णय होऊन तब्बल १५ दिवस होऊन गेल्यानंतरही कोणत्याच बँकेत हवी तेवढी रक्कम पुरवली जात नसल्याने आर्थिक उलाढालीचा हाहाकार झाला आहे. बँकेत रक्कम असूनही खातेदारांना तीन ते चार हजार रुपये मिळत असल्यामुळे लोक धास्तावले असून रोखीने होणारे सर्व बाजार, व्यवहार गेले काही दिवस ठप्प आहेत.
करंट आणि सेव्हींग या दोन्ही खातेदारांना आपल्या खात्यातील रक्कम काढण्याचा अधिकार नियमाप्रमाणे आहे. अत्यल्प व्याजानेही रक्कम बँक स्वीकारते. बहुसंख्य व्यापारी आपले सर्व आर्थिक व्यवहार करंट खात्यामार्फत करतात. दिवसभरात किती वेळा पैसे टाकणे-काढणे यावर या खात्यासाठी निर्बंध नाही. मात्र नोटाबंदीनंतर हे सर्व व्यवहार ठप्प झाले असून आपल्याच खात्यातून पैसे काढता येत नाहीत, हा अनुभव दररोज घेऊन छोटे-मोठे व्यावसायिक जेरीस आले आहेत.
नेहमीच्या खातेदारांचीही ३ ते ४ हजार रुपये काढण्यासाठी बँकेसमोर रोज रांग लागत असून रांगेमध्येच अर्धा दिवस जात आहे. बँक कर्मचारी, व्यवस्थापक यांच्याशी रोज हमरीतुमरीचे प्रसंग विविध ठिकाणी घडत आहेत. सर्वसामान्यांच्या या हालांबद्दल बेफिकीर बँकांनी हात वर केले आहेत. बँकेतर्फे असे सांगण्यात येत आहे की, पुरेशी रक्कमच बँकेत येत नसल्याने आम्ही प्रत्येक खातेदाराला हवी तेवढी रक्कम देऊ शकत नाही. याचवेळी अनेकदा काही विशेष खातेदारांना मात्र व्यवस्थित नोटा भरणा आणि बदलाची ‘सुविधा’ उपलब्ध केली जात आहे, असे निरीक्षण आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर असे जाहीर करण्यात आले की, पर्यायी चलन म्हणून ५०० आणि २००० च्या नोटा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. खातेदारांनी घाबरू नये. अशी जाहीरातही सुरू होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चार वेळा हीच घोषणा केली. जर पर्यायी चलन उपलब्ध आहे तर आमचेच पैसे मिळत का नाहीत? हा खातेदारांचा सवाल आहे. बँकेकडेच ही रक्कम दिली जात नसल्याने सावळा गोंधळ सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या भितीप्रमाणे पैसे मिळत नसल्यास खातेदाराच्या असंतोषाचा भडका उडू शकतो. कारण गरजेसाठी असलेली रक्कम मिळत नसल्याने खातेदार हैराण आहेत.
सुरुवातीला असे घोषित करण्यात आले की, खातेदाराला आपल्या खात्यातून आठवड्याला २४,००० रु. काढता येतील. तशी तरतूद असल्यामुळे खातेदारांना वाटले की फार अडचण नाही. मात्र कोणत्याही बँकेने असे पैसे उचलू दिलेले नाही. आठवडा ४००० रु. रक्कम. त्यामुळे दिवसाचा खर्च जेमतेम ५०० रु.च्या आत भागवावा लागतो. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंपासून रोजचा प्रवास व इतर खर्च समाविष्ट आहे. चार जणांच्या कुटुंबात एकजण कमावता असल्यास बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आवश्यक असूनही काही बाबींवर खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे नोटाबंदीने कमालीची छळवणूक सुरू असल्याचा संताप सामान्य माणसांमध्ये व्यक्त होत आहे.
