राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकरांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन वाद सुरु असताना, आता भाजपमधील आणखी एकाच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वर्षागणिक लोकांची शैक्षणिक पात्रता वाढते. मात्र, महाराष्ट्रात असेही काही नेते आहेत ज्यांची शैक्षणिक पात्रता दिवसागणिक कमी होते आहे. नागपूर भाजपचे विद्यमान अध्यक्ष आणि नागपूर पूर्व मतदारसंघात आमदार कृष्णा खोपडे यांचं शिक्षण 2014 विधानसभेवेळी चक्क 5 वर्षांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कृष्णा खोपडे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ अशा दोन वेळेला निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ७ वी उत्तीर्ण असल्याचं दाखविले होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे हेच कृष्णा खोपडे २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बी कॉमच्या प्रथम वर्षात शिकत होते. ऐकून धक्का बसला ना… २००९ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी कृष्णा खोपडे यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते १२ वी उत्तीर्ण असून नागपूरच्या धरमपेठ कॉमर्स कॉलेजमधून बी कॉम प्रथम वर्षात शिकत असल्याचे नमूद केले होते. म्हणजेच जी व्यक्ती २००९ मध्ये बी कॉम प्रथम वर्षात होती. तीच व्यक्ती २०१४ मध्ये ७ वी उत्तीर्ण राहिली.
२००९ च्या निवडणुकीच्या वेळी नजरचुकीने आपली शैक्षणिक पात्रता जास्त दाखविली. कदाचित कोणातरी दुसऱ्याची शैक्षणिक पात्रता माझ्या नावासमोर टाकली गेली, असे स्पष्टीकरण आमदार कृष्णा हेगडे यांनी दिले आहे. जनतेच्या दरबारात खोटे दावे करून २००९ ची निवडणूक जिंकल्याबद्दल कृष्णा खोपडे आता सहा वर्षानंतर जनतेची माफी मागत आहेत.
मुळात निवडणूक लढवताना उमेदवाराची खरी क्षमता मतदारांच्या समोर यावी म्हणून निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र घेत सत्य जनतेसमोर मांडण्याची अट लागू केली. मात्र, सर्वच पक्षाचे उमेदवार प्रतिज्ञापत्रावर ही खोटी माहिती देत आहेत, ही नक्कीच गंभीर बाब आहे.

